ती वाऱ्याच्या वेगाने तिथे आली आणि अहंमन्य गायिका असलेल्या तिच्या मातेला अंत:करण पिळवटून बोलू लागली, " अगं आई संगीत म्हणजे तरी काय शेवटी ? जीवनाच्या गीताला हृदयातला आपुलकीचा सूर देणं म्हणजेच ना संगीत? त्या सुराला मर्यादांचं म्हणजे लय तालाचं बंधन घालणं म्हणजेच ना संगीत? साथीदारांबरोबर राहून त्यांचा ताल लय समजून गाणं म्हणजेच ना संगीत? नवरसांचा परिपोष करून जीवन आनंदी करणं म्हणजेच ना संगीत? प्रियकरासाठी आतुर, व्याकुळ नायिका, आपलं सर्वस्व तन मन धन रूपे अर्पित करणारी नायिका, केवळ सुरातून उभी करणारी तू, यातला कोणता एक भाव तुझ्या जीवनात आला? काम / शृंगार तरी आला असेल का? गाण्यातून प्रेम, ओढ, वात्सल्य हे भाव जागृत करायचे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशावरच तृप्त व्हायचं का? संगीत ईश्वर साधनेचं माध्यम म्हणून वापरणारे थोडे. बाकी तुझ्यासरख्या सगळ्यांनी गाऊन साधुसंत व्हावं अशी अपेक्षा नाही. पण भावना जपणारं, अतिरेकी भावनांना गाण्याच्या मदतीने घासून टाकून निष्कलंक होणारं व्हावं ना? एखादा गायक दिवसांचं दुःख संध्याकाळी मारवा गाऊन विसरून जाईल. पुन्हा सकाळी भैरव गाऊन ताजातवाना होईल. नव्या सुखद:खांना समोरा जाईल तर त्याचं जीवन आनंदमय होईल. अन्यथा संगीत म्हणजे होईल नुसता सोपान मोठेपणाचा, पैशाचा, प्रसिद्धीचा आणि अहंकाराचा. मग जीवनाचा खरा आनंद त्याला पारखा होईल. खरंखुरं समाधान, सुख मला हवंय.
मला हवंय जीवनाला अर्थ देणारं, दुसऱ्याच्या वेदनांवर फुंकर घालणारं, आनंदाच्या बागा फुलवणारं संगीत. मग मी तुझ्यासारकी नावाने आणि पैशाने मोठ्ठी नाही झाले तरी चालेल. पण मला ते समाधान मिळेल. अंतरंगातल्या सुरांचं सुख मी अनुभवेन. चल निघते मी. शरपंजरी पडलेल्या माझ्या लाडक्या बाबांच्या जखमेवर कोमल स्वरांचं मलम लावायला. भैरवीचे चार नाही पण भैरवाचे दोन कोमल सूर गाऊन त्यांना जागं करीन मी. " एवढे बोलून ती आल्या पावली परत निघालीसुद्धा !
-
माझ्या कथा संग्रह पुस्तकातून 4 निवडक ओळी.
डॉ प्रसाद फाटक पुणे 2
फोन 9822697288
Comments
Post a Comment